मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – शहरातील एका 19 वर्षीय तरुणीवर बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. बलात्कारानंतर त्याने तरुणीला गच्चीवरुन ढकलून दिले. यात तिच्या मणक्याचे हाड तुटले असून तिची प्रकृती गंभीर आहे.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीचे नाव अरविंद सिंह असून तो पिडीतेच्या शेजारी राहत होता. घरातला कोपरा अन कोपरा माहित असलेला आरोपी सोमवारी रात्री सगळे झोपले असताना घराच्या छतावरुन पिडीतेच्या खोलीत शिरला. तिला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा पीडितेने तिथून पळण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला छतावरुन खाली ढकलले. यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्या मणक्याचे हाड तुटले आहे. पिडीतेला मेरठ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवून घेतला मात्र त्यात बलात्काराच्या ऐवजी छेडछाड केल्याचे म्हटले होते. त्यानंतर जेव्हा पीडितेच्या वडिलांनी याविरोधातआवाज उठवला तेव्हा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला व त्या नराधमला अटक केली.
पीडितेच्या मणक्याचे हाड तुटले असून प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तिला जिल्हा रुग्णालयातून लाला लजपतराय मे़डीकल कॉलेजमध्ये हलवण्यात आल्याची माहिती पिडीतेच्या भावाने दिली. तसेच पिडीतेची घरची परिस्थिती बेताची असून त्यांना उपचाराचा खर्च परवडणारा नसल्याचेही त्याने सांगितले.







