ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कधी बजाज फायनान्स तर कधी इंडिया बुल्स कंपनीतून बोलतोय… आपण घेतलेल्या लोनची सेटलमेंट करून देतो, असे सांगून लोकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरचा शिवाजी पार्क पोलिसांनी भंडाफोड केला. पोलिसांनी त्या कॉल सेंटरवर छापा टापून सहा तरुणी व पाच तरुणांना अटक केली.
दादर पश्चिमेला राहणारे म्हात्रे (61) यांनी 2018मध्ये बजाज फायनान्सकडून अडीच लाखांचे कर्ज घेतले होते. गेल्या एप्रिल महिन्यात लॉकडाऊन लागल्याने म्हात्रे यांनी मोरोटोरियमसाठी विनंती केली. त्या विनंतीवरून बजाज फायनान्सकडून ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान 17 नोव्हेंबर रोजी म्हात्रे यांना दोन कॉल आले आणि त्यांनी बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर तुम्ही घेतलेल्या लोनपैकी 34 हजार शिल्लक असून त्या पेमेंटचे सेटलमेंट करून देतो, असे सांगत भामटय़ांनी म्हात्रे यांच्याकडून 17 हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपींनी म्हात्रे यांना टाळण्यास सुरुवात केली.
आपली फसवणूक झाल्याचे कळताच म्हात्रे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पंढरीनाथ कांदे तसेच उत्तम महाडिक, ज्ञानेश्वर केकान, संदीप शेलार, विनोद पाटील, महेंद्र बाविस्कर, गुंजाळ व शेजवळ या पथकाने तपास सुरू केला.







