खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – एका महिलेवर चाकूचे वार करून वडीगोद्री येथील डाव्या कालव्यात फेकून दिले. सुदैवाने त्या महिलेने स्वतःचा जीव वाचवत ती डाव्या कालव्याच्या पाण्यातून बाहेर आली. ही घटना 13 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजेच्या दरम्यान घडली. ही घटना जालन्यातील वडीगोद्री येथील डाव्या कालव्याजवळ घडली. सदर महिलेने जालना जिल्ह्यातील अंकूश राठोड, लिलाबाई राठोड व त्याचा मुलगा रवी राठोड यांनी तिला मारहाण करत जीवे मारल्याचा आरोप केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सुशिला विश्वास राठोड या महिलेने अंकूश राठोड, लिलाबाई राठोड व रवी राठोड यांना उसने पैसे दिले होते. ते पैसे घेण्यासाठी ती जालन्याला आली होती. मात्र त्या तिघांनी तिला मारहाण करत तिच्याकडील सोने व पैसे लुटले. त्यानंतर तिच्यावर चाकूने वार करत तिला पोत्यात भरून कालव्यात फेकले. सदर महिलेने कसे बसे त्या पोत्यातून स्वत:ला बाहेर काढले व ती पोहत डाव्या कालव्यातून बाहेर आली. जखमी महिलेला पाहून गावकऱ्यांनी तिला वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सदर महिलेच्या गळ्याला कमरेला, तोंडावर व पाठीवर चाकूचे वार होते व ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील जावळे यांनी प्राथमिक उपचार केले आहेत.
या घटनेची माहिती कळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक हनुमंत वारे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे करत आहे.







