गाझियाबाद (उत्तर प्रदेश) – उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नाही म्हणून एका भावाबहिणीच्या जोडीने नकली कंपनी थाटून 1500 जणांना चुना लावला आहे. निखिल आणि प्रियंका अशी या भाऊ-बहिणीची नावं आहेत.
हा प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडला आहे. येथील एका नकली प्लेसमेंट एजन्सीवर पोलिसांनी धाड टाकली. तेव्हा तिथे 20 मोबाईल, 225 रिझ्युम्स, 10 ट्रेनिंग लेटर आणि अन्य काही सामान आढळलं. ही एजन्सी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेत होती. 2017पासून सुरू असलेल्या या एजन्सीचा पोलिसांना पत्ताच नव्हता.
या एजन्सीचे प्रमुख निखिल आणि प्रियंका हे दोघेही सख्खे भाऊ-बहिण असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. या दोघांनी गेल्या तीन ते चार वर्षांत 1500 जणांना चुना लावल्याचंही तपासात उघड झालं आहे. निखिल आणि प्रियंका हे दोघेही उच्च शिक्षित आहेत. प्रियंका ही कायद्याची पदवीधर आहे तर निखिल एमबीए झाला आहे. त्यामुळे या दोघांनी असं का केलं असावं असा प्रश्न पोलिसांना पडला होता.







