वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर व्हाइट हाऊस सोडलं आहे. व्हाइट हाऊस सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना वॉशिंग्टन विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपल्या निरोपाच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी कुटुंब आणि मित्रांचे आभार मानले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण कोणत्या ना कोणत्या तरी स्वरुपात पुन्हा परत येणार असल्याचं सूचक विधान केलं आहे. मी नेहमी लोकांसाठी संघर्ष करत राहणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं. एएफपीने यासंबंधी वृत्त दिलं आहे. काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प लवकरच आपला नवा पक्ष स्थापन करणार असल्याचं वृत्त दिलं आहे.
“आमच्या कार्यकाळात काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. तुम्ही सर्वांनी खूप मेहनतीने काम केलं आहे. माझ्यासाठी कार्यकाळ खूप खास होता. आम्ही माजी सैनिकांचा सन्मान केला. आम्ही अमेरिकेच्या लष्कराला पुन्हा एकदा उभं केलं आहे. अमेरिकेच्या इतिहासात करामध्ये सर्वाधिक सूट दिली,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.
“आम्ही जेवढ्या मेहनतीने काम केलं आहे तेवढ्या मेहनतीने कोणीच करु शकलेल नाही. कोणत्याही ना कोणत्या स्वरुपात आम्ही पुन्हा येईल. मी नेहमी तुम्हा लोकांसाठी संघर्ष करत राहणार आहे,” असं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी दिलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी जो बायडन यांचा उल्लेख टाळत म्हटलं की, “नवीन प्रशासनाला मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या यशासाठी प्रार्थना. मला वाटतं की खरोखर काहीतरी चांगलं करण्याची त्यांना संधी आहे”. “अमेरिका जगातील सर्वात मोठा देश आणि अर्थव्यवस्था आहे. करोना महामारीमुळे आपल्याला खूप मोठा फटका बसला. पण आपण असं काही केलं आहे जो वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार समजला जातो. आम्ही नऊ महिन्यात करोना लस विकसित केली,” असं त्यांनी सांगितलं.







