पत्रकार व इतर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा – सत्यजित तांबे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनावर यशस्वी नियंत्रण मिळविणाऱ्या जगातील मोजक्या उदाहरणामध्ये “धारावी” चा उल्लेख करणे म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन ! कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार, महापालिका आणि प्रशासन अथक परिश्रम घेत आहे. त्याचेच हे फळ आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सामाजिक संस्था, नागरीक आणि एखादा अपवाद वगळता सर्वच राजकीय संघटना सर्वतोपरी मदत करीत आहेत. अगदी गावपातळीवर देखील कोणाला कामावरून कमी करून त्याचा रोजगार जाणार नाही याची काळजी देखील मालकवर्ग घेत आहे.
राज्यातील वृत्तपत्र व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात आला असुन पत्रकारांना वेतन देण्यासाठी पैसे नसल्याचे कारण पुढे करीत राज्यातील विविध वृत्तपत्र समुहातील जवळपास बाराशेहून अधिक कर्मचान्यांना आतापर्यंत कामावरुन कमी करण्यात आले आहे. यातील अनेकजण दहा-पंधरा वर्षांहून जास्त काळ नोकरी करत होते. यामध्ये वार्ताहर, उपसंपादक, छायाचित्रकार, मुद्रितशोधक, डीटीपी ऑपरेटर अशी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अचानक नोकरी गेलेल्या या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात नवीन नोकरी मिळणे अवघड आहे. पत्रकारांनी कोरोना काळात कुठे नोकरी मिळवायची असा मोठा प्रश्न आहे.
आपण “सामना” सारख्या वृत्तपत्राचे मुख्य संपादकपद सांभाळले आहे. आपल्या कुटुंबाला या क्षेत्राची एक विशेष परंपरा आहे. त्यामुळे आपण या क्षेत्रातील पत्रकार व इतर कर्मचारी वर्गाच्या समस्या सहानभूतीने जाणून घ्याल याबद्दल मला विश्वास आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला असून आपण याबाबत तातडीने पुढाकार घेऊन या क्षेत्रातील पत्रकार व इतर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे एका पत्रकाद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here