मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरोधात मुंबईतील अंधेरी न्यायालयामध्ये मानहानीचा दावा दाखल केला आहे. या संदर्भात कंगनाला 22 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जुहू पोलिसांनी बजावले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगनाने काही वाहिन्यांवर जावेद अख्तर यांच्या विरोधात वक्तव्य करत हृतिक रोशन संदर्भात माझ्यावर जावेद अख्तर हे दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात जावेद अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे.
‘एका वर्षापूर्वी जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला होता. हृतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे आहेत, जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्याय सुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल,’ अशा शब्दात जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कंगना रणौतने केला आहे.
जावेद अख्तर हे हृतिक रोशन संदर्भात काही गोष्टी सांगत असताना सतत माझ्यावर ओरडत होते. त्यामुळे मी फार घाबरले होते, असेही कंगनाने तिच्या एका मुलाखतीत म्हटले आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.







