सांगली (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील एका पोल्ट्री शेडवरील शेकडो कोंबड्या मंगळवारी दुपारनंतर अज्ञात रोगाने मृत्यूमुखी पडल्या आहेत. दरम्यान, या घटनेची बातमी वार्यासारखी पसरली असून बर्ड फ्ल्यूच्या धास्तीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संबंधित पोल्ट्री मालकाने याची माहिती पशूसंवर्धन विभागाला देण्याऐवजी सर्वच मृत कोंबड्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून जवळच असलेल्या जुन्या वज्रचौंडे बंधार्यालगतच्या परिसरात उघड्यावर फेकल्या आहेत. मळणगाव-नागेवाडी रस्त्यावर पाच हजार पक्ष्यांची दोन शेड आहेत. मंगळवारी दुपारनंतर शेडमधील शेकडो कोंबड्या अचानक एका क्षणात मृत्यूमुखी पडल्या. ही धक्कादायक बाब संबंधित पोल्ट्री मालकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रशासनाला कळविण्याचे सोडून गुप्तता पाळली.
सायंकाळनंतर अंधार पडू लागताच संबंधित पोल्ट्री मालकाने सर्व मृत कोंबड्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून उघड्यावर फेकून दिल्या. त्यानंतर काही वेळात परिसरातील पाळीव तसेच भटक्या कुत्र्यांनी मृत कोंबड्यांचा फडशा पाडायला सुरुवात केली. पोल्ट्री शेडपासून कोंबड्या फेकून दिलेल्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्यावर तोंडात कोंबड्या घेऊन पळणारी आणि फिरणारी कुत्री दिसत होती. तसेच रस्त्यावरही मृत कोंबड्या दिसत होत्या.







