नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळली. या अपघातात ६ मजुरांना जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक मजूर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तोरणमाळहून म्हसावदकडे निघालेली खाजगी प्रवासी जीप खोल दरीत कोसळली. या जीपमध्ये पंधरापेक्षा अधिक मजूर प्रवासी प्रवास करीत होते. यातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच म्हसावद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच या अपघातातील मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील दोन नंबरचे थंड हवामान असलेल्या तोरणमाळ परिसरात मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण होत असते. दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे येथील स्थानिकांना अवैधरित्या खाजगी प्रवासी जीपने प्रवास करावा लागतो.







