पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – येथील आपटे रस्त्यावरील एचडीएफसी बँकेत ग्राहकांनी गोल्ड लोनसाठी तारण ठेवलेल्या तब्बल एक किलो सोन्याची तीन पाकिटे बँकेच्या सहव्यवस्थापक महिलेने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून महिला व तिला मदत करणारा तिचा मेव्हणा या दोघांना अटक करण्यात आली आहे.
किरण धोत्रे (वय २४, रा. वडार हौसिंग सोसयटी, मॉडेल कॉलनी) आणि तिचा मेव्हणा दीपक ढवळे (वय ३२, रा. आळंदी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७७० ग्रॅम सोने व रोख आठ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. ८ जानेवारी २०२१ रोजी आपटे रस्त्यावरील एचडीएफसी बँकेत हा प्रकार घडला. या प्रकरणी बँकेने अंतर्गत चौकशी केली होती. त्यानंतर त्यांनी डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा लंबे व किशोर शिंदे यांनी केला.







