ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पाहुणी म्हणून नातेवाईकांच्या घरी गेलेल्या एका मेव्हणीच्या २३ वर्षीय मुलीनेच साडेचार लाखाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली. ही घटना भिवंडी तालुक्यात कारिवली गावात घडली असून, याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मोना उर्फ धनश्री पाटील (वय २३) असे चोरीचा गुन्हा दाखल झालेल्या मुलीचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यात कारिवली गावात शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरात ४ ते ७ जानेवारी २०२१ दरम्यान मेव्हणीची मुलगी मोना उर्फ धनश्रीने दागिने चोरी केली असल्याची तक्रार त्यांनी काल भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. मोनाने नाईक यांच्या घरातील कपाटाची चावी स्वतःकडे घेवून कपाट उघडले व त्यामधून ४ लाख ५० हजार रुपयांचे दागिने चोरले, अशी तक्रार गोकुळ नाईक यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एस.एम घुगे करीत आहेत







