ड्रग्स डीलर चिंकू पठाणचे भिवंडीतही कनेक्शन; सराफा व्यावसायिकासह एकाला अटक

chinku-pathan

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मुंबईतील चिंकू पठाणचे ड्रग्स रॅकेटचे कनेक्शन उघड करण्यात एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांना यश येत असताना आता या रॅकेटचे कनेक्शन भिवंडीत पोहोचले आहे. भिवंडी शहरातील पद्मानगर भागात राहणाऱ्या रोहित वर्मा याला अमली पदार्थ विक्री प्रकरणी एनसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. त्याला पैसे पुरवणारा सोन्याचा व्यावसायिक विक्रांत उर्फ विकी जैन हा वर्मा आणि चिंकू पठाण यांना ड्रग्ससाठी पैसे पुरवत असल्याचे समोर आले आहे. विक्रांत उर्फ विकी जैन यास भिवंडीतील ब्राम्हण आळी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

हिंदी चित्रपटातील हिरो आणि हिरोईन यांना ड्रग्स पुरवणाऱ्या चिंकू पठाण याच्या पुण्यातील साथीदाराच्या घरावर एनसीबीच्या पथकाने छापेमारी केली. राजू सोनावणे नावाच्या सप्लायरवर ही धाड टाकण्यात आली. विशेष म्हणजे, तीन दिवसापूर्वीच चिंकू पठाण एनसीबीच्या जाळ्यात अडकला होता. गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. याच कारवाईदरम्यान, एनसीबीने चिंकू पठाणला अटक केली. त्यानेच भिवंडीतील विक्की जैनचे नाव सांगितले. शिवाय त्याच्याकडे सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आल्याचे सांगण्यात आले.

दाऊदचे हस्तक गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ड्रग्स विकून ते पैसे दाऊदला पाठवत होते. हवाला मार्गे कोट्यवधीची रक्कम मुंबईबाहेर पाठवली जात होती. गेल्या ५ वर्षामध्ये तस्करांनी १ हजार ५०० कोटींचे ड्रग्स विकले होते. हा पैसा दाऊदकडे पोहोचल्यानंतर तो हे पैसे दहशतवाद्यांना कारवाया करण्यासाठी पुरवत होता, अशी खळबळजनक माहिती उघड झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here