दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसा; अमित शहांची तातडीची बैठक

amit-shah

नवी दिल्ली – केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज दिल्ली ट्रॅक्टर परेड काढली. पण या ट्रॅक्टर परेडला हिंसक स्वरुप आलं. अनेक ठिकाणी ट्रॅक्टर घुसवून पोलिसांवरच हल्ल्याचा प्रयत्न झाला. तसंच काही पोलिसांच्या वाहनांची तोडफोड झाली. काही शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी सौम्य लाठीमार करत त्यांना बाहेर काढल्याचं सांगण्यात येतंय.

आयटीओ भागात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने स्टंट केली. तसंच पोलिसांवरही ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक सुरू आहे. अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत शेतकरी आंदोलनाच्या स्थितीचा आढावा घेतला जात आहे. तसंच पुढे काय कारवाई करण्यात येणार यावर निर्णय घेतला जाईल. या बैठकीत केंद्रीय गृहसचिव आणि दिल्ली पोलिस आयुक्त उपस्थित आहेत.

दरम्यान, हिंसाचारामुळे दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सिंघू सीमा, गाझीपूर, टिकरी, मुकरबा चौक, नांगलोई या भागातील इंटरनेट सेवा रात्री १२ वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलीय.

गाझीपूर सीमेवर तैनात पोलिसांवर हल्ला करण्यात आला. यात दोन पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. पूर्व दिल्लीचे अतिरीक्त पोलिस आयुक्त मंजीत आणि एक प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी यात जखमी झाला. या पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बॅरिकेड्स तोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here