पूल पाडायला आलेले कामगार रशियाने बनविलेली लस घेऊन कामावर आलेत का? – उमेश चव्हाण यांचा सवाल

पुणे (पंढरी गायकवाड) – इमर्जन्सी म्हणून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला कोरोना होतो, तर मग पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडणाऱ्या कामगारांना करोना होत नाही का? पूल पाडणाऱ्या कामगारांना रशियाची लस दिलीय का ? असा उपरोधिक सवाल रूग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सरकारला केला आहे.
याबाबत बोलताना परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, कालपासून सुरू झालेले लॉकडाऊन शिस्तबद्ध सुरू आहे, आणि विनाकारण बाहेर पडल्याचा दंड म्हणून नागरिकांना काठीचा प्रसादही खावा लागत आहे. रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभ्या असणाऱ्या पोलिसांना जवळील हॉस्पिटलच्या नावांची यादी आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड शिल्लक आहेत? याची माहिती दिली, तर रुग्णाला घेऊन बेड शोधणाऱ्या नातेवाईकांना दहा हॉस्पिटल पालथी घालावी लागणार नाहीत.
आज लोहगाव येथील एक ज्येष्ठ नागरिक, काळेवाडी येथील एक कॅन्सरग्रस्त महिला बेड कुठे शिल्लक आहेत ? याचा शोध घेत आहेत तर हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीत म्हणून वेळीच उपचार न मिळाल्याने जनता वसाहत येथील तीस वर्षे वयाचा एक तरुण कार्यकर्ता आज मृत्युमुखी पडला आहे. यामुळे पुणे शहरातील कार्यकर्त्यांत हळहळ व्यक्त होत असून लोकांत संतापाची भावना आहे. हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक आहेत का? म्हणून शोध घेणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकाला पोलिसांच्या काठीचा बेदम प्रसाद मिळाला आहे. डिपॉझिट भरले तरच उपचार करणाऱ्या हॉस्पिटलचे परवाने तात्काळ रद्द करावेत, कडक कारवाई करावी.
पोलिसांनी बळाचा वापर करण्याआधी विनाकारण फिरत असल्याची खात्री करावी, आणि मगच काठीचा वापर करावा अशी रूग्ण हक्क परिषदेची विनंती आहे, असे चव्हाण म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here