संपूर्ण उत्तर प्रदेशात चित्ररथ फिरविण्याचा योगी सरकारचा निर्णय
लखनऊ – प्रजासत्ताक दिनाच्या संचलनावेळी राजपथावर झळकलेल्या चित्ररथांमध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून राम मंदिराचा चित्ररथ सादर करण्यात आला होता. प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे. अशावेळी पहिल्यांदाच राजपथावर राम मंदिराचा चित्ररथ सहभागी झाला होता. या चित्ररथाला उपस्थितांनी उभे राहून नमन करत त्याचे स्वागत केल्याचे दिसत होते. याच चित्ररथाने यंदा संचलानातील चित्ररथात पहिला क्रमांक पटकवला आहे. आता संपूर्ण उत्तर प्रदेशात हा चित्ररथ फिरवण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.
राम मंदिराच्या चित्ररथावर पवित्र ग्रंथ रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी हे रामायणाची रचना करताना दाखवण्यात आले होते. तसेच मागे अयोध्येत निर्माणाधीन असल्यालेल्या मंदिराची भव्य प्रतिकृती इथे दिसत होती. तर आजूबाजूला प्रभू श्रीरामचंद्राचे गुणगान गात चालणारे महान ऋषीगण दाखवण्यात आले होते.
तसेच रथावर रामायणातील लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले प्रसंग जसे शबरीचे बोर चाखणे, चित्रकूट पर्वतावरील राम-भरत भेट असे विविध प्रसंग कोरण्यात आले होते. यासोबतच अयोध्येत शरयू तिरावर साजरी होणारी दिवाळी देखील यावेळी दाखवण्यात आली होती. तसेच चित्ररथावेळी जे गाणे वाजवण्यात आले त्यामध्ये अयोध्या आणि उत्तर प्रदेशच्या भूमीची महत्ता सांगण्यात येत होती. या चित्ररथाला उपस्थित मंडळीनी उभे राहून नमस्कार केला आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
राम मंदिराच्या या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. विजेत्यांना दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर प्रदेश सरकारने सूचना मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या आहेत.







