हरियाणा – आयसीयूत दाखल असलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार हरियाणा येथे घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही पीडित तरुणी 22 वर्षांची असून हरियाणा येथील पानीपत जिल्ह्यात मतलौडा गावातील आहे. ती मानसिक रुग्ण असून तिला पोटासंबंधीचा आजार होता. 25 जानेवारीला तिच्या अचानक पोटात दुखायला लागले. त्यामुळे तिला रात्री जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिच्यावर उपचारांचा भाग म्हणून तिला रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. ती मानसिक रुग्ण असल्याचा फायदा घेत तिथल्या दोन कर्मचाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला. मात्र पीडिता जोरदार ओरडल्याने बाहेर बसलेले नातेवाईक धावत आले. त्यांनी पाहिले असता त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना पकडून बेदम चोप दिला. मात्र आरोपींनी स्वत:चा बचाव करत तिथून पलायन केले.
पिडीत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पीडितेच्या वडिलांनी आरोपी कर्मचाऱ्यांविरोधात मॉडल टाऊन पोलिस स्थानकात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांच्या हाती रुग्णालयातील सीसीटीव्ही फूटेज लागलं असून त्या आधारे आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.







