पुणे (कार्यकारी संपादक निलेश बटाणे) – किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशनतर्फे ‘कानन दरस करो’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडितजींचे पुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी तसेच नातू विराज श्रीनिवास जोशी विविध बंदिशी सादर करणार असून पंडिजींच्या सांगितिक तसेच व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणार असल्याची माहिती संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आणि समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी दिली.

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ दि. 4 फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम दि. 3 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 5.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. या कार्यक्रमात श्रीनिवास जोशी पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि संगीताच्या विविध पैलूंवर रचलेल्या रचनांचे सादरीकरण करणार आहेत. तर विराज जोशी ज्योतीने तेजाची आरती हा कार्यक्रम सादर करणार आहेत. पांडुरंग पवार (तबला), गंगाधर शिंदे (हार्मोनियम) साथसंगत करणार आहेत.श्रीनिवास जोशी हे स्वत: रचलेल्या बंदिशी या कार्यक्रमात सादर करणार आहेत. तर विराज जोशी आपल्या गायनातून पंडितजींना नमन करणार आहेत.
पंडित भीमसेन जोशी यांना कार्यक्रमांमध्ये तब्बल 40 वर्षे टाळ या वाद्याची साथ करणारे माऊली टाकळकर आणि तबल्याची साथ करणारे नाना मुळ्ये (मुंबई) यांचा सन्मानपत्र देऊन विशेष गौरव विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास किराणा घराण्यातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका मीना फातर्पेकर, पंडित उपेंद्र भट, सानिया पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. राजेश पांडे यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाची निर्मिती सुनील महाजन यांनी केली असून संयोजन निकिता मोघे यांचे आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.







