प्रेयसीचा अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने केला वृध्देचा खून

old-woman-murder

अहमदनगर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे भरदुपारी वृद्धेचा खून करून लुटल्याची घटना 19 जानेवारी रोजी घडली होती. प्रत्यक्षदर्शी कुणीही साक्षीदार नसतानाही पोलिसांनी आठ दिवसांत गुन्ह्याची उकल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. प्रेयसीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अश्विनी दत्तात्रय पंडित (वय 19, रा. फत्तेबाद, श्रीरामपूर, हल्ली रा. मंठा, ता. जालना) आणि भाऊसाहेब उर्फ भावडय़ा झुंबर येलमामे, भाऊसाहेब उर्फ भावडय़ा झुंबर येलमामे (वय 30, रा. मिरपूर, ता. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सावित्राबाई मोगल शेळके (वय 65) असे मयत वृद्धेचे नाव आहे.

संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर शिवारातील सावित्राबाई शेळके या वृद्ध महिलेचा अंगावरील दागिन्यांसाठी खून झाल्याची घटना 19 जानेवारी रोजी समोर आली होती. या प्रकरणात आरोपीने शेळके यांच्या अंगावरील अडीच तोळे वजनाचे दागिने घेऊन पोबारा केला. याच दरम्यान या वृद्धेच्या दुकानात खाऊ घेण्यासाठी एक चारवर्षीय लहान मुलगी आली. तिच्या कानातील बाळ्या या चोरटय़ाने कानांसह ओरबाडून घेतल्या. यानंतर संशयित आरोपी फरार झाला होता.

मयत वृद्ध महिला 18 जानेवारी रोजी तिची आतेसून अश्विनी पंडित हिच्याकडे गेली होती. यावेळी दोघींमध्ये काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यातून संबंधित वृद्धेने तिला मारहाण व शिवीगाळ केली. त्या रागाच्या भरातच ती वृद्धा तेथून संगमनेरला निघून आली. मारहाण केल्याचा राग आल्याने अश्विनीने ही घटना आपला प्रियकर भाऊसाहेब येलमामे याला सांगून म्हातारीचा बेत बघण्यास सांगितले होते. या घटनेच्या दुसऱयाच दिवशी येलमामे याने कौठे कमळेश्वरमध्ये येऊन वृद्धेचा खून केला. हा प्रकार चोरी अथवा दरोडय़ाचा भासवण्याचाही पूर्ण प्रयत्न झाला. ‘त्या’ लहान मुलीकडून केवळ ‘काळा शर्ट घातलेला माणूस’ इतकीच तोकडी माहिती पोलिसांकडे होती. त्या आधारावर पोलिसांनी कौठे कमळेश्वर, मेंढवण, मिरपूर, तळेगाव, लोहारे व कासारे या सर्व ठिकाणी शोध घेतला. तांत्रिक तपासावर भर देत पोलिसांनी जालना जिह्यातील मंठा तालुक्यात छापा घालून भाऊसाहेब आणि अश्विनी या दोघांच्याही मुसक्या आवळल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here