मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – व्हिंटेज कारबद्दल सर्वांच्या मनात कुतूहल असते. अशाच दुर्मिळ व्हिंटेज कार रविवारी मुंबईच्या रस्त्यांवरून धावताना दिसणार आहेत. निमित्त आहे ते रविवारी सकाळी बीकेसी ते बॅलार्ड इस्टेट दरम्यान पार पडणाऱया व्हिंटेज ड्राईव्ह रॅलीचे. तब्बल 100 व्हिंटेज कार आणि क्लासिक मोटारसायकल या रॅलीत सहभागी होणार असून मुंबईकरांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
महाराष्ट्र टुरिझम आणि ‘थिंग्ज टू डु’च्या वतीने ‘द मुंबई फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 31 जानेवारीला सकाळी बीकेसी येथून व्हिंटेज कार रॅलीला सुरुवात होईल. यासाठी व्हिंटेज अॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाचे सहकार्य मिळाले आहे. तब्बल 70-80 वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ कार मुंबईच्या रस्त्यांवर धावतील.







