मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईत थंडीचा कडाका वाढला आहे. सलग दोन दिवस 15 अंशांच्या आसपास राहिलेला पारा शुक्रवारी पहाटे 14.8 अंशांच्या निच्चांकी पातळीवर घसरला. चालू मोसमातील हे सर्वात कमी तापमान ठरले. मुंबई शहर व उपनगरांत महाबळेश्वर आणि माथेरान या थंड हवेच्या ठिकाणांपेक्षा अधिक गारवा होता. त्यामुळे मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेले मुंबईकर चांगलेच कुडकुडले.
हवामान खात्याच्या नोंदीनुसार, शुक्रवारी सांताक्रूझमध्ये किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन अंशांची घट होऊन 14.8 अंश इतकी नोंद झाली. कुलाब्यातही सरासरीपेक्षा 2 अंशांची घट होऊन 15.7 अंश तापमान नोंदवले गेले. त्यामुळे मुंबई शहरासह उपनगरांत सर्वत्र हवेत गारवा निर्माण झाला आहे. याआधी डिसेंबरमध्ये 15 अंश निच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. राज्याच्या बहुतांश भागांत गारठून टाकणारी थंडी आहे. शुकवारी राज्यात सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये 10.8 अंश इतके नोंद झाले. तसेच पुण्यात 12.7, मालेगाव-12.8, डहाणू-14.2, महाबळेश्वर- 15, माथेरान- 16.2 अंश तापमान होते.







