मुंबई (वार्ताहर दत्ता राव) | खाजगी अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज दिनांक २० जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे तीव्र लक्षवेधी आंदोलन पार पडले. श्री. विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन घेण्यात आले.
आंदोलनातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या अत्यंत न्याय्य व साध्या असून, त्यांना सध्या मिळणारी पेन्शन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे लागू करण्यात यावी, ही त्यांची मुख्य मागणी आहे. अशा अनेक प्रलंबित प्रश्नांमुळे सेवानिवृत्तांवर आर्थिक अत्याचार होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या पायऱ्या झिजवूनही न्याय मिळत नसल्याने शेवटी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
या आंदोलनाचे गांभीर्य म्हणजे, वयाची साठ ते ऐंशी वर्षे ओलांडलेले अनेक ज्येष्ठ व वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक भर पावसातही आपल्या न्याय हक्कासाठी व शासनाकडून दखल घेतली जाईल या अपेक्षेत मैदानावरप्रतिक्षा करत बसले होते.
या आंदोलनाची दखल घेत माजी महापौर श्रीम. किशोरीताई पेडणेकर आणि श्री. आझमी यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांचे मनोबल वाढवले.








