कानपूर (उत्तर प्रदेश) – देशात आतापर्यंत पोलीस खात्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. तर अनेकदा पोलिसांचे लाच घेतानाचे व्हिडिओही समोर आले आहेत. पण हे पोलीस काही सुधारायला तयार नाहीत. सध्या अशी असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये पोलिसांनी एका अपंग भिकारी महिलेकडून गाडीमध्ये डिजेल भरण्यासाठी तब्बल 15 हजार रुपयांची लाच घेतली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं एसएसपी कार्यलयात जावून रडून रडून न्यायाची भीक मागितल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे.
संबंधित घटना उत्तरप्रदेशातील कानपूर येथील आहे. या पीडित महिलेची 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी गेल्या एका महिन्यापासून बेपत्ता आहे. तिच्या मते एका ठाकूर नामक व्यक्तीने तिच्या मुलीला उचलून नेलं आहे. याप्रकरणी तिने चकेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. याउलट स्थानिक पोलिसांनी मुलीला शोधण्याच्या नावाखाली तिच्याकडून अनेकवेळा गाडीच्या डिजेलसाठी पैसे उखळले आहेत. पोलिसांनी बेपत्ता मुलीला शोधण्याच्या नावाखाली पीडित महिलेकडून प्रत्येक वेळी दोन ते अडीच हजार रुपयांचं डिजेल भरुन घेतलं आहे.
या प्रकरणी तक्रार लिहून एक महिना उलटला असतानाही पोलिसांनी मुलीला शोधण्याच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई केली नाही. याउलट पीडित महिलेला पोलिसांनी ठाण्यातून प्रत्येकवेळी हाकलून दिलं आहे. यामुळे पोलिसांच्या त्रासदायक वागणुकीला कंटाळलेल्या पीडित महिलेनं थेट कानपूरच्या एसएसपी कार्यालय न्यायाची भिक मागितली आहे. यावेळी पीडित महिलेची रडून रडून अवस्था वाईट झाली होती. तिची अवस्था पाहून एसएसपी प्रतिन्दर सिंह यांनी या पीडित अपंग महिलेची तक्रार ऐकून घेतली आहे. आरोपी ठाकूर विवाहित असून त्याने तिच्या मुलीला उचलून नेलं आहे. याची माहिती आरोपीच्या कुटुंबालाही आहे, असंही पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. यांनतर कानपूर एसएसपी प्रतिन्दर सिंह यांनी पीडित महिलेच्या तक्रारीची दखल घेत. लवकरात लवकर मुलीला शोधण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच संबंधित आरोपी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचंही एसएसपीनी सांगितलं आहे.







