मुझफ्फरनगर (बिहार) – येथे एका महिलेला छेडछाडीच्या विरोधात आवाज उठवल्याची जबर किंमत मोजावी लागली आहे. छेडछाडीला विरोध केल्याने आरोपीनं महिलेच्या तीन महिन्यांच्या मुलीला शेकोटीमध्ये ढकलल्याची धक्कादायक घटना इथं घडली आहे. पीडित महिलेनं घाईघाईनं मुलीला बाहेर काढलं मात्र तोपर्यंत मुलीचा पाय जळाला होता.
बोचहा या पोलीस चौकीच्या क्षेत्रातल्या एका गावातली ही घटना आहे. जवळच्या सरकारी दवाखान्यात मुलीवर उपचार करण्यात येत आहेत. पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बोचहा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गावात एक महिला आपल्या घराबाहेर शेकोटी पेटवून बसली होती. त्यावेळी त्याच गावातील मोहम्मद अकलू नावाचा माणूस तिथं आला. शेकोटीचा शेक घेण्याच्या बहाण्यानं त्यानं त्या महिलेची छेड काढली. महिलेनं विरोध करताच आरोपीनं तिच्या मांडीवरील तीन महिन्याच्या मुलीला ओढलं आणि शेकोटीत फेकून दिलं. त्यानंतर तो तिथून फरार झाला. महिलेनं मुलीला ताबडतोब बाहेर काढलं पण मुलीचा पाय बराच भाजला होता.
या घटनेनंतर महिला त्वरीत पोलीस स्टेशनला गेली. मात्र तिथं तक्रार न घेतली गेल्यानं ती एसएसपीकडे गेली. तिथून आता पुढील कारवाई करण्यात येत आहे. पीडित महिलेच्या पतीनं सांगितले की, माझी पत्नी घराच्या बाहेर थंडी असल्याने शेकोटीभोवती बसली होती. शेजारी राहणारा मोहम्मद आला आणि तिची छेड काढायला लागला. तिनं विरोध करताच आरोपीने मुलीली शेकोटीत फेकले. मुलगी गंभीर जखमी झाली आहे. आम्ही वरपर्यंत तक्रार करून न्याय मागितला आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडून शिक्षा करावी. यावर डीएसपी वैद्यनाथ सिंह यांनी सांगितलं आहे की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 341, 323, 354, 307 या कलमांसह छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







