रांची (झारखंड) – मानवी तस्करी ही जागतिक समस्या आहे. नुकतेच झारखंडमध्ये मानवी तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गरजू मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची विक्री केली जात असल्याचा संतापजनक प्रकार रांचीत उघड झाला आहे. आतापर्यंत 500हून अधिक मुलींचा सौदा करणाऱ्या आरोपी महिलेला शुक्रवारी रांची विमानतळावर रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
पूनम बारला असे आरोपी महिलेचे नाव असून ती पूनम प्लेसमेण्ट सर्व्हिस एजन्सी चालवत होती. या एजन्सीच्या नावाखाली ती मानवी तस्करीचा व्यवसाय करत होती. गेली आठ वर्षे ती हा व्यवसाय करत असून पाचशेहून अधिक मुलींची आतापर्यंत तस्करी केल्याचे तिने पोलिसांच्या तपासात कबूल केले आहे. या एजन्सीतून मुलींना चांगली नोकरी देण्याचे ती आमिष दाखवून त्यांची तस्करी करत होती. तस्करीसाठी तिला एका मुलीमागे 40 हजारांचे कमिशन मिळत होते.
ही महिला शुक्रवारी ७ मुलींना दिल्लीला घेऊन जात असल्याची पोलिसांना टीप मिळाली. पोलिसांनी गुरुवारी रांची एअरपोर्टवर पोहोचून पूनम बारवा हिला रंगेहात पकडले. या सगळ्या मुली खुंटी जिल्ह्यातील आहेत. कोरोना महामारीमुळे ट्रेनची संख्या कमी केली आणि त्यात प्लॅटफॉर्मवर कडक तपासणी केली आहे. त्यामुळे विमानाने प्रवास करुन मानवी तस्करी केली जात होती. तसेच विमानापेक्षा ट्रेनने अधिक वेळ लागतो, त्यात फलाटांवर मानवी तस्करीमुळे कडक तपासणी सुरु असते. त्यामुळे मानवी तस्करी विमानाने करणे त्यांना सोयीचे जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.







