जमशेदपूर – देशात महिला विरोधी अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. अशातच सहलीसाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 22 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 17 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर पीडित अल्पवयीन मुलीची मेडिकल तपासणी करण्यासाठी तिला एमजीएम रुग्णालयात पाठवलं आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
अल्पवयीन पीडित मुलगी झारखंडमधील जमशेदपूरच्या परसुडीह येथील रहिवाशी असून ती येथे आपल्या आजी आजोबांसोबत राहते. तिचे आई-वडील दुसऱ्या वस्तीत राहतात. पीडित मुलगी मोलकरणीचं काम करते. रविवारी तिचं काम आवरल्यानंतर ती 6 ते 7 युवकांसोबत सहलीसाठी गेली होती. दरम्यान चांदणी चौक येथील एका शौचालयात या मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 17 जणांना ताब्यात घेतलं असून 6 युवकांचा बलात्कारामध्ये सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी सतत तिच्या विधानात बदल करत आहे. तर दुसरीकडे ज्या युवकांना ताब्यात घेतलं आहे, त्या युवकांच्या नातेवाईकांनी परसुडीह पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे. ताब्यात घेतलेल्या युवकांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. असं असलं तरी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.
अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबानंतर, पोलिसांनी 17 आरोपी युवकांना ताब्यात घेतलं आहे. यातील काही आरोपी परसुडीह येथील रहिवासी आहेत, तर काहीजण जादुगोडा येथील रहिवासी आहेत.







