सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – जेवणासाठी हॉटेलात आलेल्या टोळक्याने अचानक पिस्तुल काढून फायरिंग केल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भंडारी (ता. उस्मानाबाद) येथील हॉटेल रिलॅक्समध्ये बुधवारी (ता. ३) दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घडली. जखमीला उपचारासाठी लातूर येथील दवाखान्यात पाठविण्यात आले आहे.
लातूरमार्गे तुळजापूरच्या दिशेने निघालेल्या एका मोटार कार मधील सहा अनोळखी लोक जेवणासाठी हॉटेल रिलॅक्समध्ये आले होते. काही कारणाने त्यातील एकाने अचानक पिस्तुल काढून दोन राउंड फायर केले. त्यातील एक गोळी हॉटेल मालक बाळासाहेब मोरे यांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले. हे पाहून चिडलेल्या उपस्थित अन्य लोकांनी टोळक्यातील लोकांवर हल्ला केला. टोळक्यातील एकास लोकांनी धरून ठेवले. मारहाण केली. मारहाणीमुळे त्याची शुद्ध हरपली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला उपचारासाठी उस्मानाबाद येथील दवाखान्यात पोलिसांनी नेले आहे.
दरम्यान टोळक्यातील सहा पैकी पाच लोक मोटार कारासह फरार आहेत. एकाला अटक करण्यात आली असून त्याची शुद्ध हरपली आहे. दरम्यान पोलिसांना तिथे फायर केलेल्या गोळीची एक पुंगळी मिळाली आहे. असे पोलिस हेड कॉन्स्टेबल रविकांत जगताप यांनी सांगितले.







