मालेगाव (प्रतिनिधी आकाश सावंत) – झटपट श्रीमंती कोणाला नको असते, पण याचाच फायदा घेत एखादा भामटा तुमचा खिसा रिकामा करु शकतो. गुंतवलेले पैसे ठरावीक वेळेत दुप्पट मिळतील असे अमिष दाखवून वृध्द महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.
सन 2011 ते 17 या काळात देविदास अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमत करुन पगारे यांच्याकडून रियल लाईफ ॲग्रो केटल प्रा. लि., रियल लाईफ क्रियेट्रअर्स इंडिया लि. तसेच एलआयसीआय डेव्हलपर्स लिमिटेड अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे डायरेक्टर व एजंट असल्याचे भासवून विश्वास संपादन केला.
शहरातील कॅम्प शिवाजीनगर भागातील 62 वर्षीय वृध्देला विविध कंपन्यांच्या नावाने पैसे गुंतवत मुदतीनंतर दामदुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवत खोटे प्रमाणपत्र देवून सुमारे 2 लाख 86 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ठकबाजी प्रकरणी कुमूद पगारे (वय 62) यांच्या तक्रारीवरुन देविदास अहिरे यांच्यासह सात संशयितांविरुध्द कॅम्प पोलिस ठाण्यात ठकबाजी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन आदेशानंतर छावणी पाेलिसांनी पगारे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघे संशयित बाहुबलीनगर धुळे येथील, दोघे संशयित झोडगे येथील तर एक संशयित देवारपाडे येथील आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.







