सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – शहर, जिल्हा तसेच उस्मानाबाद व कर्नाटकातून मोटारसायकली चोरून त्या दुचाकी सोलापुरात विकण्याचा प्रयत्न करणार्या अमोल धोत्रे व शरीफ शेख या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 6 लाख 45 हजारांच्या 9 मोटारसायकली जप्त केल्या. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.
अमोल महादेव धोत्रे (रा. अणदूर, ता. तुळजापूर) व शरीफ मौला शेख (रा. इटकळ, ता. तुळजापूर) अशी या दोन अट्टल मोटारसायकल चोरट्यांची नावे आहेत. दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींनी शहर व जिल्ह्यात मोटारसायकली चोरल्या होत्या. काही मोटारसायकली या परराज्यांतून चोरल्या होत्या. या चोरलेल्या मोटारसायकली विक्री करण्यासाठी हे दोन्ही भामटे हे सोलापुरात आले होते.
ही बाब गुन्हे शाखेच्या पथकाला समजल्यावर पोलिसांनी हैदराबाद रोडवरील मंत्री चंडकनगराजवळ दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्या दोघांनी आणखी एका साथीदाराच्या मदतीने मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली व त्यांच्याकडे असलेली मोटारसायकलसुध्दा चोरीचीच असल्याची कबुली दिली.
दोन्ही आरोपींनी उमरगा, आळंद, उस्मानाबाद तसेच शहर परिसरात चोरलेल्या 9 मोटारसायकली व गुन्ह्यात वापरलेली कार, असा 6 लाख 45 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, पो.नि. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित कुंभार, पो.कॉ. फुटाणे, पाटील यांनी पार पाडली.







