सांगली (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – भेसळीच्या संशयावरून एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अन्नपदार्थांचा साठा शेळकेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनातर्फे मे. सटवाई दूध संकलन केंद्रावर छापा टाकून ही कारवाई केली, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त सु. आ. चौगुले यांनी दिली.
ते म्हणाले, शेळकेवाडी येथे या दूध संकलन केंद्रावर दुधात भेसळ केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकण्यात आला. भेसळीच्या संशयावरून 1 लाख 1 हजार 669 रुपये किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. भेसळीच्या संशयावरून म्हैस व गाईचे दूध, रिफाईन्ड सोयाबिन तेल या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेऊन शिल्लक साठा जप्त करण्यात आला.
दुधाचा साठा नष्ट करण्यात आला. अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा अधिकारी ए.व्ही. कोळी, पी.एन स्वामी व नमुना सहायक एस. एम. कवळे यांनी कारवाईत सहभाग घेतला .







