रोहा-रत्नागिरी रेल्वे विद्युतीकरण पूर्ण; रेल्वेचे वाचणार 200 कोटी

roha-ratnagiri-railway

रत्नागिरी – अकराशे कोटी रुपये खर्चून केल्या जात असलेल्या कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पातील रोहा ते रत्नागिरी या 285 कि. मी.च्या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्याची कार्यपूर्तीची डेडलाईन 31 डिसेंबरलाच संपली आहे. नुकत्याच पूर्ण झालेल्या कामाचे सीआरएस इन्पेक्शन (रेल्वे सुरक्षा आयुक्तांची तपासणी) होऊन रोहा ते रत्नागिरी मार्गावर विजेवर रेल्वे गाड्यांमधून प्रवास कधी घडतो, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकिर्दीत सन 2015 मध्ये कोकण रेल्वेचे दीर्घकाळ रखडलेले विद्युतीकरण तसेच दुपदरीकरण यांच्या कामांना रायगडमध्ये त्यांच्याच हस्ते प्रारंभ झाला होता. यापैकी विद्युतीकरणाच्या कामाकरिता 1100 कोटी रुपये इतका खर्च केला जात आहे. विद्युतीकरण तसेच मार्ग दुपदरीकरण ही दोन्ही कामे एकाच वेळी सुरु असून यातील विद्युतीकरणाचा दक्षिण टोकाकडील एक टप्पा या आधीच पूर्ण झाला आहे. आता रोहा ते रत्नागिरी या 285 किलोमीटरच्या पट्ट्यातील विद्युतीकरणाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे आता रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून विद्युतीककृत मार्गाची तपासणी करुन हा मार्ग येत्या काही दिवसात विजेवर चालणार्‍या गाड्यांच्या सेवेसाठी सोपवला जाणार आहे.

विद्युतीकरण तसेच दुपदरीकरणाच्या कामाबरोबरच 10 नवीन स्थानके उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. यातील खारेपाटण तसेच सापे वामने ही स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल देखील झाली आहे. नवीन स्थानकांपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबणी तसेच कडवई या स्थानकांची कामे पूर्ण झाली असून त्यांचेही लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे हे काम लांबणीवर पडले होते.

विद्युतीकरणाच्या कामामुळे रेल्वेचा सध्या डिझेलवर चालणारा वार्षिक खर्च 300 कोटी रुपयांवरून 100 कोटी रुपयांवर येणार आहे. विद्युतीकरणामुळे रेल्वेचा केवळ डिझेलवर होणारा खर्चच वाचणार नसून प्रदूषण कमी करण्यातही याचा मोठा हातभार लागणार आहे. याचबरोबर विद्युतीकरणामुळे रेल्वे गाड्यांची ऑपरेशन क्षमता वाढण्यासही मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here