पवईत झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा छडा; मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

अटक
file photo

मुंबई (क्राइम रिपोर्टर सुहास मोरे) | पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अनोळखी इसमाच्या निर्घृण खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा खून करण्यात आल्याचे समोर आले असून, पवई पोलिसांनी मुख्य आरोपीला थेट उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून शिताफीने अटक केली आहे.

 

दिनांक २४ मे २०२६ रोजी मध्यरात्री २:०० ते पहाटे ६:१७ वाजण्याच्या सुमारास, तुंगागाव, साकिविहार रोड येथील ‘लोढा सुप्रीमस आऊटगेट’ जवळ एका अनोळखी इसमाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता. अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी धारदार शस्त्राने त्याच्या छातीच्या डाव्या बाजूवर वार करून त्याचा खून केला होता. या प्रकरणी सरकारतर्फे पवई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८९/२६, कलम १०३(१) बी.एन.एस. २०२३ (BNS) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पवई पोलीस ठाणे आणि परिमंडळ १० मधील इतर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे मिळून एकूण ८ वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली.

तपास पथकाने स्थानिक परिसरामध्ये कसून चौकशी केली असता, मयत इसमाचे नाव ‘युसुफ’ (रा. मनुभाई चाळ, मुंबई) असल्याचे निष्पन्न झाले. परंतु, त्याचे कुटुंबिय मिळून येत नसल्याने आणि तो फुटपाथवर राहत असल्याने खुनाचा नेमका हेतू स्पष्ट होत नव्हता. पोलिसांनी मानवी कौशल्यांचा वापर करत २५ ते ३० संशयितांकडे कसून चौकशी केली. तसेच घटनास्थळ आणि परिसरातील तब्बल १०० ते ११० सी.सी.टी.व्ही (CCTV) कॅमेरे तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यात प्रामुख्याने दोन इसमांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या समोर आले.

गुन्हा केल्यानंतर आरोपी मुंबई सोडून परराज्यात पळून गेले होते. मुख्य आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी स्वतःचा पेहराव बदलला आणि डोक्याचे केस कापून आपली ओळख लपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. मात्र, तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला. मा. वरिष्ठांच्या आदेशाने तात्काळ दोन पथके रवाना करण्यात आली आणि मुख्य आरोपीला वार्ड नंबर चार सुदामपुरी, जिल्हा बांदा, राज्य उत्तर प्रदेश येथून अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन  प्रमोद राम कृपाल वर्मा (वय २४ वर्षे, धंदा- मजुरी, रा. सुदामपुरी, पो. ठाणे अतारा, जिल्हा बांदा, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रमोद वर्मा याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याने त्याचा साथीदार दीपक ऊर्फ दिपू नथूप्रसाद वर्मा (वय २६ वर्षे) याच्यासह मिळून युसुफचा खून केल्याचे सांगितले आहे. पोलीस आता त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त मा. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का व सु) मा. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मा. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) मा. दत्ता नलावडे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मा. प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. जितेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक सुशांत बंडगर (गुन्हे), पो.नि. जयदिप गोसावी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संतोष कांबळे, पोउपनि यश पालवे, सागर पवार, गणेश आव्हाड, राकेश नलावडे, प्रशांत केंद्रे, सुहास कादे, मनोज भोसले आणि अंमलदार तानाजी टिळेकर, रमेश नलावडे, मारुती सुरनार, जयदेव चव्हाण, विशाल पिसाळ (तांत्रिक मदत) व इतर पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही धडक कारवाई पूर्ण केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here