नाशिक (उपसंपादक – इंजि. कुबेर जाधव) | गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे दर सातत्याने घसरत असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या उदासीन आणि धरसोड वृत्तीमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. रोजच कुठे ना कुठे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असताना, सरकार मात्र निवडणुकांमध्ये मग्न आहे. या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज चांदवड येथे तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून शेतकऱ्यांचा भव्य बैलगाडी मोर्चा निघाला. हा मोर्चा थेट मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील चांदवड चौफुलीवर धडकला. तेथे भर उन्हात हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत तब्बल दोन तास महामार्ग रोखून धरला. यामुळे महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनाचे नेतृत्व आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार भास्करराव भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आणि खासदार शोभाताई बच्छाव यांनी केले.
यावेळी नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असताना राज्यातील सत्ताधारी हे केवळ विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये गुंतले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही घेणे-देणे नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी, नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) च्या अधिकारी व दलालांच्या भल्यासाठी केवळ दोन लाख टन कांद्याची तुटपुंजी खरेदी करण्याची घोषणा केली गेली. मात्र, प्रत्यक्षात खरेदीचा कुठेही पत्ता नाही,” असा आरोप यावेळी करण्यात आला.
दुपारी ११ च्या सुमारास आंदोलकांनी महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांच्या टायरची हवा काढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी काही ठिकाणी टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. आंदोलन करणारे आमदार रोहित पवार, खासदार भास्करराव भगरे, शशिकांत शिंदे, खासदार राजाभाऊ वाजे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार शोभाताई बच्छाव, माजी आमदार अनिल कदम, आणि माजी आमदार संजय चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. नेत्यांना अटक करून महामार्ग मोकळा करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, तरीही काही काळ वाहतूक विस्कळीतच होती.
प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा तीव्र निषेध केला.
या राज्यव्यापी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), स्वाभिमानी शेतकरी संघटना, आणि शरद जोशी प्रेरित शेतकरी संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. या आंदोलनात चांदवडसह देवळा, कळवण, बागलाण, आणि मालेगाव तालुक्यातील हजारो संतप्त कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले होते.







