अजातशत्रू व्यक्तिमत्त्व शैलेश पवार यांचा वाढदिवस भउर येथे उत्साहात व साधेपणाने संपन्न; विविध शाळांमध्ये फराळ वाटप

भउर

नाशिक (उपसंपादक इंजि. कुबेर जाधव) | “ज्या व्यक्तीला इतरांच्या कष्टाची आणि माणसांची किंमत असते, त्याच व्यक्तीला जग खरी किंमत देते. जो माणूस कुठलाही अहंकार न बाळगता पाय जमिनीवर ठेवून वाटचाल करतो, तो समाजात स्वतःचे अतुट स्थान निर्माण करतो.” असे गौरवोद्गार काढत, मानूर येथील ‘शरद पवार पब्लिक स्कूल’चे अध्यक्ष, अभ्यासू व अजातशत्रू व्यक्तिमत्त्व श्री. शैलेशदादा पवार यांचा ४९ वा वाढदिवस त्यांच्या जन्मगावी, भउर येथे अत्यंत साधेपणाने परंतु उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी भउर गावातील सर्व वस्तीशाळा, जिल्हा परिषद मराठी शाळा आणि माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांना फराळाचे (केळी) वाटप करण्यात आले.प्रगतशील पवार घराण्यात जन्मलेल्या श्री. शैलेश पवार यांनी नेहमीच सामाजिक जाणिवेतून आपले कार्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यात आजवर ५० पेक्षा जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ५ हजारांपेक्षा अधिक बाटल्या रक्त संकलन केले असून गरजूंना मोलाची मदत केली आहे. २०१० सालापासून ‘प्रेरणा फाऊंडेशन’च्या माध्यमातून स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत पहिल्या दहा विद्यार्थ्यांना ते मोफत शिक्षण देतात. २००७ सालापासून तालुक्यातील नागरिकांसाठी त्यांनी अविरत मोफत ॲम्बुलन्स सेवा सुरू ठेवली आहे. कोविड काळात जिल्ह्यातील पोलीस, पत्रकार व शासकीय कर्मचाऱ्यांना १५ हजार कोविड किटचे वाटप करून त्यांनी आपले सामाजिक कर्तव्य चोख बजावले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांचा विशेष गौरव केला होता.

श्री. शैलेश पवार हे अतिशय साधे, सरळ, दिलखुश आणि मदतीसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व आहेत. विरोधी पक्षातही मित्र जोडणारा, तरुणांना नेहमी मदत करणारा, वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातील फरक ओळखणारा आणि माणुसकीच्या नात्याने एक-एक माणूस जोडत जग जिंकणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी सिद्धेश्वर विद्यालयात मार्गदर्शन करताना केले.

लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा वाढदिवसाचा सोहळा पार पडला. डॉ. जे. डी. पवार विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. दीपक पंडित पवार, मिलिंद पवार, कवी आभा आहेर आणि कुबेर जाधव यांच्या सौजन्याने भउर येथील सर्व शाळांमध्ये हा फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी भउर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पगार, श्रीमती आशाताई अहिरराव, श्री. बागुल सर, तसेच मराठी शाळेचे अशोक बच्छाव, कविता आहेर, रत्नमाला देवरे, वृषाली देसले, अरुण आहेर, देवाजी बनकर, अरुणा सूर्यवंशी, कुंदन देवरे, राजेंद्र देवरे, श्रावण आहेर आदी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. दीपक पवार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here