राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीचे शासकीय सन्मानाने नियोजन करा, अन्यथा राज्यव्यापी जनआंदोलन

अहिल्यादेवी होळकर

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे रोजी असणारी जयंती शासनाने आणि प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने राज्यभरात भव्य-दिव्य स्वरूपात व शासकीय सन्मानाने साजरी करावी. अन्यथा, धनगर समाज व ‘शिवशाही शासन’ संघटनेच्या वतीने मार्गदर्शक अशोकभाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली तीव्र राज्यव्यापी जनआंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा लोकसेवक युवराज दाखले आणि गणेश खरात यांनी दिला आहे.

 

या संदर्भात बोलताना लोकसेवक युवराज दाखले म्हणाले, “राजमाता अहिल्यादेवी होळकर या केवळ एका विशिष्ट समाजाच्या नसून, संपूर्ण भारतवर्षाच्या माता आहेत. त्यांनी काशी विश्वेश्वरापासून ते सोमनाथपर्यंत मंदिरांचा जीर्णोद्धार केला, घाट, धर्मशाळा आणि विहिरी बांधून लोककल्याणकारी राज्याचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला. असे असतानाही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दरवर्षी त्यांच्या जयंतीकडे दुर्लक्ष करते, ही खेदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि इतर महापुरुषांप्रमाणेच राजमाता अहिल्यादेवींची जयंतीही संपूर्ण शासकीय इतमामात साजरी झालीच पाहिजे.”

‘शिवशाही शासन’ आणि ‘शिवशाही व्यापारी संघा’ ने केलेल्या प्रमुख मागण्यात ३१ मे रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन बंधनकारक करावे, मुंबई मंत्रालय, सर्व जिल्हाधिकारी कार्यालये तसेच तहसील कार्यालयांमध्ये राजमाता अहिल्यादेवींची भव्य प्रतिमा लावून शासकीय अभिवादन कार्यक्रम आयोजित केले जावेत, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी कार्यावर आधारित व्याख्याने आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करून युवा पिढीला प्रेरित करावे, धनगर समाजाच्या प्रलंबित आरक्षण प्रश्नावर सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, हीच अहिल्यादेवींना खरी आदरांजली ठरेल.

“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ जयंती नियोजनाचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध करावे. जर प्रशासनाने यात दिरंगाई केली, तर येत्या ३१ मे रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर हजारो धनगर बांधवांच्या आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत ‘अहिल्या माता सन्मान मोर्चा’ काढण्यात येईल. राजमातेचा कोणत्याही प्रकारचा अवमान शिवशाही शासन सहन करणार नाही,” असा स्पष्ट इशारा युवराज दाखले आणि गणेश खरात यांनी शेवटी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here