पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण एमआयडीसीचा (MIDC) दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उद्योजक, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. ”केवळ पाहणी करून प्रश्न सुटणार नाहीत, तर निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे”, असा स्पष्ट संदेश सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिला.
चाकण MIDCमध्ये रस्त्यांची दुरवस्था, साइड शेल्डरचा अभाव, वाहनांसाठी पार्किंगची समस्या, पाणीपुरवठा, वीजपुरवठा तसेच अंडरग्राउंड केबल यांसारखे अनेक प्रश्न गेल्या काही काळापासून कायम आहेत. याशिवाय PMRDA, महापालिका, MIDC आणि महावितरण अशा विविध यंत्रणांशी संबंधित प्रश्नांमुळे उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या सर्व समस्यांचा समन्वयानं पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करून नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचं सांगण्यात आलं. विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रश्नांची निश्चित मुदतीत पूर्तता करण्यावर भर देण्यात येणार आहे. कामात अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा किंवा दिरंगाई आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही उद्योगमंत्री सामंत यांनी दिला.
“मंत्री पाहणीला आले म्हणून प्रश्न सुटत नाहीत; निर्णय घेऊन त्याचा निकाल दिसला पाहिजे,” हा या संपूर्ण बैठकीतील संवादाचा प्रमुख सूर ठरला. आता चाकण MIDCतील उद्योजकांच्या समस्या प्रत्यक्षात कितपत मार्गी लागतात आणि संबंधित विभागांकडून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी किती वेगानं होते, याकडे उद्योजकांचं लक्ष लागलंय.
खड्डे, वाहतूक कोंडी, पाणी-विजेच्या समस्या, कचरा आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांवरून पुण्यातील चाकण औद्योगिक परिसर चर्चेत आलाय. भारतातील सर्वात मोठे ‘ऑटो हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीमधून 20 लघुउद्योगांनी स्थलांतराचं नियोजन केलंय. या कंपन्यांची एकत्रित वार्षिक उलाढाल सुमारे १ हजार कोटी रुपये असून, त्यामध्ये २ हजारांहून अधिक कामगार कार्यरत आहेत.







