जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या ठिय्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. महावितरणने आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत जळगाव ग्रामीण आणि चाळीसगावसह संपूर्ण जिल्ह्यात सलग ८ तास वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
विजेच्या लपंडावामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोन्ही पक्षांच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना कोणत्याही खंडेशिवाय सलग १० तास वीजपुरवठा मिळालाच पाहिजे, विद्युत कायदा २००३ च्या कलम ४३ आणि ५७ नुसार सुरळीत वीज मिळणे हा शेतकऱ्यांचा कायदेशीर हक्क आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला खंडित वीजपुरवठा हा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) च्या गुणवत्ता मानकांचा (SOP) थेट भंग आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून, वीजपुरवठा त्वरित सुरळीत न झाल्यास ग्राहक मंच, CGRF आणि विद्युत लोकपाल यांच्याकडे भरपाईसाठी दावा दाखल केला जाईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी महावितरणला दिला.
आंदोलनाची तीव्रता पाहता महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. तसेच वीज वितरण कंपनीच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलकांना यासंबंधीचे अधिकृत लेखी पत्र सुपूर्द केले. या आश्वासनानंतर आंदोलन यशस्वीरीत्या मागे घेण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पिताताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, एजाज मलिक, महेश बोरसे, महानगर तालुकाध्यक्ष रिंकू चौधरी, संग्राम पाटील, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, डॉ. रमाकांत कदम, प्रमोद सोनवणे, स्वप्नील राजपूत, सुमित सपकाळे, संजय जाधव, वाय. एस. महाजन, हिलाल पाटील, बाळू धनगर, बाळू पाटील आणि प्रवीण पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.







