जागतिक कर्करोग दिन दि. 4 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे आढळले आहे. केवळ भारतात एका वर्षात जवळपास 11 लाख नवीन रुग्णांचे निदान होणे चिंताजनक ठरत आहे. बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाच्या अभावामुळे हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2011-12 या एका वर्षात महाराष्ट्रात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण 25 टक्क्यांनी वाढले. साताऱ्यातील ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरच्या सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तेजल गोरासिया सांगतात की, कर्करोगामध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण 27.7 टक्के, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण 16.5, तर बीजाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण 6.2 टक्के आहे. तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे भारतात दर चौथ्या मिनिटाला एक महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान होते.
भारतीय स्त्रियांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारे कर्करोग
गर्भाशयाच्या मुखाचा (सर्व्हायकल कॅन्सर) कर्करोग
स्तनांचा कर्करोग
बीजाशयाचा कर्करोग
तोंडाचा कर्करोग
कोलोरेक्टल कर्करोग
लक्षणे कोणती
योनीमार्गातून होणारा रक्तस्राव
थकवा जाणवणे
अन्नावरील वासना उडणे
पेल्विक पेन्स (वेदना)
स्तनाग्रांमधून होणारा स्राव
अतिसार आणि बद्धकोष्ठता
कारणे कोणती?
कर्करोगाच्या कारणांमध्ये पर्यावरणीय घटकांचादेखील समावेश आहे. त्याव्यतिरिक्त तंबाखू सेवनदेखील कारणीभूत ठरते. तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण पुरुषांमध्ये 50 टक्के, तर महिलांमध्ये 20 टक्के आहे. चुकीचा आहार हे देखील कर्करोगास कारणीभूत ठरत असून, त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता 10 ते 20 टक्के असते.
कर्करोगाचे प्रकार कोणते?
गर्भाशय मुखाचा कर्करोग – हा स्त्रियांमध्ये आढळतो. या कॅन्सरमध्ये गर्भाशयातील कोशिकांमध्ये अनियमित वृद्धी होऊन कॅन्सर जन्माला येतो. शरीरसंबंधांच्या वेळी योनीमध्ये वेदना होणे, योनीतून रक्त बाहेर पडत अचानक डिस्चार्ज होणे, खूप थकवा जाणवणे, पाय दुखणे, चिडचिड होणे, कशातच मन न लागणे, ही याची काही लक्षणे आहेत.
गर्भाशयाचा कर्करोग – गर्भाशयाचा आत एक आवरण असते, त्याला एंडोमेट्रीअम असे म्हणतात. एंडोमेट्रीअमच्या पेशी अनियंत्रितपणे वाढतात, तेव्हा त्या गर्भाशयाच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात. 21 ते 65 या वयोगटातील लैंगिकरित्या सक्रिय असलेल्या महिलेने दर तीन वर्षांनी पॅप स्मिअर चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. 30 किंवा त्याहून अधिक वय असलेल्या स्त्रियांनी दर पाच वर्षांनी ही चाचणी करून घ्यावी. यात एचपीव्हीसाठीही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस डीएनए) चाचणी समाविष्ट असावी. पॅप स्मिअरच्या सहाय्याने सुरुवातीच्या टप्प्यातच गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्यास त्यातून बचावण्याची शक्यताही वाढते.
स्तनाचा कर्करोग – यात सुरुवातीला स्तनांवर गाठ तयार होत असल्याची जाणीव होते. ही गाठ हळूहळू पसरते आणि त्यातून कॅन्सरचा विळखा पडतो. यासाठी वेळोवेळी आपल्या स्तनांची तपासणी करणे उत्तम होय. स्तनांच्या त्वचेचा रंग बदलणे, स्तन कमजोर दिसणे, लटकू लागणे, एका किंवा दोन्ही स्तनांचा आकार बदलणे, स्तनाग्रातून स्राव होणे, वेदना होणे, ही काही सामान्य लक्षणे आहेत. महिलांनी दरमहिा स्तनांची स्वतः तपासणी करावी. आपल्याला स्तनाचा कर्करोग आहे असा संशय आल्यास, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी महिन्यातून एकदा सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशनबरोबर वर्षातून एकदा ‘मॅमोग्राफी’ करून घेणे गरजेचे आहे.







