भाजपनं नाकारलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीला निवडणुकीचं तिकीट

narendra-modi

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल यांना भाजपकडून गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलंय. उमेदवारांच्या निवडीसाठी पक्षानं तयार केलेल्या नियमांवर बोट ठेवत सोनल यांना तिकीट देण्यास पक्षानं नकार दिला आहे.

नेत्यांचे नातेवाईक, महापालिकेत तीन वेळा कार्यकाळ पूर्ण करणारे तसंच ६० पेक्षा अधिक वय असणाऱ्यांना उमेदवारी देण्यात येणार नाही, असं भाजपकडून जाहीर करण्यात आलं होतं. याच निकषांवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवार निवडले गेले आहेत. ‘नियम सगळ्यांसाठी सारखेच राहतील’ असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीलात डावलण्यात आलं आहे.

सोनल यांनी भाजपकडे बोदकदेव मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडे तिकीटाची मागणी केली होती. सोनल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाऊ प्रल्हाद मोदी यांची मुलगी आहे. प्रल्हाद मोदी शहरात एक रेशनिंग दुकान चालवतात. प्रल्हाद मोदी गुजरात योग्य दर दुकान संघाचे अध्यक्षही आहेत.

भारत सरकारनं कुटुंबाच्या व्याख्येसाठी रेशनिंग कार्ड प्रमाण मानलं आहे आणि माझ्या रेशन कार्डवर नरेंद्र भाईंचं नावही नाही, त्यांनी तर देशालाच आपलं कुटुंब मानत घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज देशातील प्रत्येक भाऊ-बहिण त्यांच्या कुटुंबाचाच एक सदस्य आहे. आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं पंतप्रधानांसोबत कधी फोटोही काढला नाही तसंच सार्वजनिक रुपात त्यांच्या नावाचा किंवा पदाचा गैरवापर केला नाही, अशी तिखट प्रतिक्रिया प्रल्हाद मोदी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here