कल्याणमध्ये ७० ते ८० जणांच्या जमावाचा पोलिसांवर हल्ला

attack-on-police

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – आरोपीला अटक करून घेऊन जाताना ७० ते ८० जणांच्या जमावाने मिरा-भाईंदर पोलिसांच्या वाहनावर दगड आणि काठय़ांनी हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी कल्याणमध्ये उघडकीस आला.

कल्याण येथील अंबिवली भागातील इरणी वस्तीत अनेक गुन्हेगार वास्तव्यास आहेत. मिरा-भाईंदर पोलीस एका आरोपीला पकडण्यासाठी गुरुवारी सकाळी तेथे आले होते. या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याचवेळी वस्तीमधील जमावाने आरडाओरड सुरू केली. मात्र, त्यांचा विरोध झुगारून पथकाने आरोपीला पोलीस वाहनात बसविले आणि त्यानंतर हे वाहन मिरा-भाईंदरच्या दिशेने निघाले.

त्याचवेळी तेथे जमलेल्या ७० ते ८० जणांच्या जमावाने वाहनाचा पाठलाग केला. पोलिसांचे वाहन आंबिवली रेल्वे फाटकाजवळ पोहचले तेव्हा फाटक बंद होते. या संधीचा फायदा घेत जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक आणि काठय़ांनी हल्ला केला. मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखवत पर्यायी मार्गाने वाहन नेले. त्यामुळे पोलिसांची जमावाच्या ताब्यातून सुटका झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here