तेहरान – भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या धक्क्यातून अद्यापही सावरला नसलेल्या पाकिस्तानवर आता इराणनेही सर्जिकल स्ट्राईक केला आहे. सिस्तन आणि बलुचिस्तानच्या सीमावर्ती भागात असलेल्या अतिरेकी अड्ड्यांना लक्ष्य बनवून हा हल्ला करण्यात आला. यात अनेक अतिरेकी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले काही पाकी सैनिकही ठार झाले. इराणच्या प्रसारमाध्यमांनी गुरुवारी याबाबतचे वृत्त दिले आहे.
पाकिस्तानातील अतिरेक्यांनी तीन वर्षांपासून इराणच्या काही सैनिकांना या भागात ओलिस ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी सातत्याने प्रयत्न करून, पाकिस्तान सरकार काहीच करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डच्या एलिट कमांडो पथकाने 2 फेबु्रवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तान सरकार आणि लष्कराला कुठलीही माहिती न देता, या भागात सर्जिकल स्ट्राईक केला. विशेष म्हणजे, पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारा इराण हा तिसरा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका आणि भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता.
इराणच्या गुप्तचर यंत्रणांनी ओलिस असलेले सैनिक नेमके कुठे आहेत आणि तिथे कशा प्रकारची सुरक्षा आहे, याबाबतची सविस्तर माहिती विशेष कमांडो पथकाला दिली. त्यानंतर हल्ल्याची रणनीती तयार करण्यात आली. आठ ते दहा कमांडो या मोहिमेत सहभागी झाले होते.
आमची मोहीम यशस्वी झाले. काही पाकी सैनिक आणि अतिरेकी ठार झाले. आमचे सर्व सैनिक सुरक्षित परत तर आलेच, शिवाय ओलिस असलेल्या दोन सैनिकांनाही त्यांनी सोबत आणले. जैश-उल-अदल या अतिरेकी संघटनेने तीन वर्षांपूर्वी आमच्या 12 सैनिकांचे अपहरण करून ओलिस ठेवले होते. बर्याच वाटाघाटीनंतर यातील 9 जणांची मुक्तता करण्यात आली होती. एकाची हत्या करण्यात आली, असे या वृत्तात म्हटले आहे.







