ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – वीस रुपयांच्या इडलीसाठी एका दुकानदाराला जीव गमवावा लागला आहे. उधार राहिलेले पैसे ग्राहकाकडे मागितल्याने झालेल्या वादात तीन ग्राहकांनी दुकानदाराला मारहाण करून त्याची हत्या केली आहे. मीरारोड येथे घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
वीरेंद्र अमृतलाल यादव (26) असे या दुकानदाराचे नाव आहे. मीरारोड येथे तो इडली-सांबारचे दुकान लावतो. शुक्रवारी त्याच्या दुकानात सकाळी 10च्या सुमारास इडली खाण्यासाठी तीन ग्राहक आले. याआधी ते बऱ्याचदा वीरेंद्रच्या दुकानातून इडली खाऊन गेले होते. मात्र मागच्यावेळेचे वीस रुपये ते ग्राहक द्यायचे बाकी होते.
त्यामुळे वीरेंद्रने त्यांना मागचे वीस रुपये द्यायचे बाकी आहेत असे सांगितले. त्याच्यावरून वीरेंद्र आणि तीन ग्राहक यांच्यात वाद झाला. वाद टोकाला जाऊन त्या तिघांनी दुकानदाराला मारहाण केली. त्यात त्याला जोरदार धक्का दिला. त्या धक्क्याने वीरेंद्र जमिनीवर आपटला आणि त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. तो तडफडत पडला असताना त्या तिन्ही आरोपींनी तिथून पोबारा केला.
तडफडत पडलेल्या दुकानदाराला आजुबाजुच्या लोकांनी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वीरेंद्रचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आलेला आहे,. याप्रकरणी नया नगर पोलिस स्थानकात अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, पोलिसांनी आसपासच्या लोकांची चौकशी केली आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही ते शोध घेत आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत असून मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.







