पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुणे पोलीस दलातील एका अधिकाऱ्याचा विदेशी जातीचा कुत्रा चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यासाठी पोलिसांनी दिवसरात्र कष्ट करून सीसीटीव्हीचे फुटेज तपासून विदेशी कुत्रे चोरट्यांना ताब्यात घेतले.
पुणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या बंगल्यातून बाहेर पडलेले विदेशी कुत्रे चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
लष्कर भागातील शासकीय निवासस्थानात विजय चौधरी कुटुंबीयांसह राहायला आहेत. त्यांनी पाळलेला विदेशी कुत्रा अचानक बंगल्यातून बाहेर गेला होता. त्यामुळे रस्त्यावर एकटेच फिरणाऱ्या परदेशी कुत्र्याला पाहून दुचाकीस्वार दोघांनी त्याला पळवून नेले होते.
घरातून कुत्रा बाहेर पडल्याचे पाहून चौधरी कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर त्यांनी लष्कर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनमीत राऊत यांनी तपास सुरू केला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पडताळण्यात आले. पोलीस हवालदार चव्हाण यांना श्वान हडपसर भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हडपसर भागातून श्वानासह दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात श्वान देण्यात आले.







