मैत्रिणीने दिला लग्नाला नकार, ‘प्रपोझ डे’ला उच्चशिक्षित तरुणाने घेतला गळफास

sucide

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – शहरात ‘व्हॅलेंटाइन वीक’ साजरा होत असताना, मनातल्या प्रेमभावना व्यक्त केल्यावर लग्नासाठी मैत्रिणीने नकार दिल्यामुळे अजय अनिल थोरात (वय २५) या युवकाने घरातच गळफास घेतला. इंदिरानगर परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

इंदिरानगरातील राजसारथी सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर राहणारा उच्चशिक्षित युवक अजय अनिल थोरात (२५) याने मैत्रिणीला लग्नाची मागणी घातली. मात्र, तिच्याकडून लग्नाला नकार मिळाल्याने नैराश्यातून त्याने घरात छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी किरण श्रावण गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद प्रथमदर्शनी केली आहे.

अजयचा मित्र किरण हा कामानिमित्त घराबाहेर गेलेला असताना, अजयने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. जेव्हा किरण दुपारी घरी आला, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने दरवाजा ठोठावला तसेच अजयच्या मोबाइलवर वारंवार संपर्कही केला; मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी इमारतीमधील अन्य रहिवाशांनीही धाव घेत दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केले; मात्र दरवाजा उघडत नसल्याने रहिवाशांनी इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीत अजयला त्याच्या मैत्रिणीने लग्नाला नकार दिल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. याबाबत पुढील तपास उपनिरीक्षक हादगे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here