माजी महापौर विष्णू भंगाळे राष्ट्रवादीत परतणार?

jayant-patil

सरदार भवनच्या बाहेर लागलेल्या बॅनरमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कालच राष्ट्रवादीतील गटबाजी उघड करणाऱ्या बॅनरचे प्रकरण गाजत नाही तोच आज ना.जयंत पाटील यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याच्या पूर्वसंध्येला सोशल मिडीयावर फिरणाऱ्या व टेलिफोन ऑफिसच्या मागील सरदार वल्लभभाई लेवा भवनच्या बाहेर लागलेल्या बॅनरने जळगावच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील सध्या राष्ट्रवादी संवाद यात्रेच्यानिमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. आकाशवाणी चौकात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या बॅनरवरुन माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा फोटो गायब होवून राष्ट्रवादीतील गटबाजी उघड झाल्याचे वृत्त गाजत असतांनाच सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनच्या बाहेर लागलेल्या बॅनरवर माजी महापौर विष्णू भंगाळे यांचा फोटो झळकल्याने आता शिवबंधन बांधलेले विष्णू भंगाळे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

या बॅनरमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले विष्णू भंगाळे पुन्हा राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या बॅनरवर राष्ट्रवादी नेत्यांसह विष्णू भंगाळे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राष्ट्रवादीचे आसोदा येथील ग्रामपंचायत सदस्य हेमंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश पाटील, धानवडचे ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, लिगल सेलचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धवल पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रमोद सावळे आदींचे फोटोही आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांचा कार्यकर्ता संवादाचा कार्यक्रम लेवाभवनलाच होणार असून, लेवाभवनच्या बाहेरच दर्शनी भागात त्यांचे स्वागत करणाऱ्या व राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह असलेल्या बॅनरवर आता विष्णू भंगाळेंचा फोटो झळकल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here