चंद्रपूर – जिल्ह्यातील घुग्गुस शहरात राहणाऱ्या शुभम फुटाणे याचे महिन्याभरापूर्वी अपहरण झाले होते. मात्र आज त्याचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या शुभम दिलीप फुटाणे याचे जानेवारी महिन्यात अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी शुभमच्या कुटुंबियांकडून ३० लाखाची खंडणी मागितली होती. खंडणीची मागणी पूर्ण न झाल्याने त्याची हत्या करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह २८ दिवसानंतर एका झुडपात जळलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी गणेश पिंपळशेंडे याला अटक करण्यात आली आहे.
१७ जानेवारी रोजी रात्री डब्लूसीएल वसाहतीमध्ये राहणारा शुभम बेपत्ता झाला होता. मित्रांसोबत पार्टीला जातो असे सांगून तो घरुन निघून गेला. त्यानंतर थेट त्यांच्या अपहरणाची बातमीच आली. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे ३० लाखाची मागणी केली होती. याची माहिती शुभमच्या कुटुंबीयांनी चंद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी याचा तपास करत होते. मात्र घुग्गुस शहरातील शांतीनगर लेआउटमध्ये केवळ कवटी शाबूत असलेले अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. आरोपीने या अगोदर वीर खारकर या ८ वर्षाच्या मुलाचे घुग्गुस शहरातून ३ नोव्हेंबरला अपहरण केले होते. त्या प्रकरणात तो सध्या जामिनावर सुटला होता. आरोपीने शुभमचे अपहरण करुन खून केल्याचे पोलिसांसमोर मान्य केले आहे.
आता याप्रकरणात अटक केलेला आरोपी गणेश पिंपळशेंडे आणि शुभमचा काय संबंध आहे. याचा पोलिस तपास करत आहे. जिल्ह्यात गँगवॉर, अपहरण, दिवसाढवळ्या होत असलेले खून आणि ढासळत असलेले कायदा सुव्यवस्था यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.







