परळच्या केईएम रुग्णालय परिसरात महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला

nife-attack

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – व्हेलेंटाईनच्या दिवशीच प्रियकराने विवाहित महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज परळच्या केईएम रुग्णालय परिसरात घडली. चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून हल्ला करणाऱया राजेश काळेला भोईवाडा पोलिसांनी अटक केली.

जखमी महिला ही उपनगरात राहत असून ती एका सरकारी रुग्णालयात कंत्राटी कामगार म्हणून कामाला आहे. आज दुपारी पावणेतीन वाजता ती केईएम रुग्णालयाजवळ उभी होती तेव्हा तिच्या परिचित असणारा राजेश तेथे आला.

जुन्या प्रेमसंबंधातून त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. महिलेला काही कळण्यापूर्वी राजेशने तिच्या पोटावर चाकूने वार केले. तिच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले.

रात्री उशिरा तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. तर चाकू लागल्याने राजेशही जखमी झाला आहे. या घटनेची माहिती समजताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी राजेशला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक केली.

सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे भोईवाडा पोलिसांनी सांगितले. महिलेच्या जबाबानंतर काही बाबीचा उलगडा होणार आहे, तर राजेशने तो चाकू कुठून आणला होता त्याचा तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here