पोलीस निमंत्रित शिल्ड क्रिकेट टूरनामेंटमध्ये केली ३१ चेंडूत ७७ धावांची नाबाद खेळी
मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचे चिरंजीव आणि मुंबई संघाचे अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडूलकरने तुफानी खेळी केली आहे. अवघ्या ३१ चेंडूत त्याने ७७ धावांची नाबाद खेळी केली. विशेष म्हणजे अर्जुनने एकाच षटकांत पाच उत्तुंग षटकार खेचत येणाऱ्या आयपीएलच्या पार्श्वभूमीवर सर्वांचेच लक्ष वेधले.
पोलीस निमंत्रित शिल्ड क्रिकेट टूरनामेंटमध्ये त्याने ही कामगिरी केली. अर्जुनच्या कामगिरीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबने इस्लाम जिमखाना संघाला पराभवाची धूळ चारली.
अर्जुनने स्पिनर हशीर दाफेदारच्या एकाच षटकांत पाच उत्तुंग षटकार खेचले. अर्जुन तेंडूलकर यावर्षीच्या आयपीएल लिलावात सहभागी असून कोणता संघ अर्जुनला स्थान देतो ते पाहणे उत्सुकतेचा विषय ठरत आहे.







