भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

चेन्नई – इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा दणदणीत पराभव केला. चेन्नई येथील चेपॉक मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात अश्विनच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचे खेळाडू तग धरु शकले नाहीत. ४८२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ १६४ धावातचं गारद झाला. भारतीय संघाने हा सामना ३१७ धावांनी जिंकला.

दुसऱ्या सामन्यात विजय संपादन करत भारताने या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. पदापर्णात पाच बळी घेणारा अक्षर पटेल या सामन्याचा खरा हिरो ठरला. भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी करत या सामन्यात चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात रोहित शर्माने १६१ धावा केल्या.

दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लडचा संघ खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. पहिल्या सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या कर्णधाराचा भारतीय गोलंदाजासमोर टिकाव लागला नाही. इंग्लडच्या एकाही फलंदाजाला साध्या ५० धावासुद्धा करता आल्या नाहीत.

या विजयासह भारताने आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. आता इंग्लडचा संघ या पराभवानंतर पहिल्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here