गुंडाला मिरवणूक पडली महागात…

पुणे (प्रतिनिधी) – कुख्यात गुंड गजानन मारणेची दोन खुनातून निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्याला कारागृहातून सोडण्यात आले. यावेळी गजानन मारणेची थेट तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी आता गजानन मारणेसह त्याच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन मारणे हा जेलमधून सुटून बाहेर आला. यानंतर त्याने आणि त्याच्या सर्मथकांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर जंगी मिरवणूक काढली. यामध्ये ५०० पेक्षा अधिक गाड्यांचा समावेश होता. यावेळी उर्से टोलनाका येथे थांबले आणि त्यांनी आरडाओरडा करत बेकायदेशीर गर्दी जमवून फटाके वाजवले. तसेच, ड्रोनने चित्रीकरण करत दहशतीचे वातावरण निर्मिती केल्याने मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून गजानन मारणे याची निर्दोष मुक्तता झाली. यानंतर गजानन मारणेची सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. मारणेचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्याची एक्सप्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली असून त्यात ५०० हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी होत्या.

टोलनाक्यावरील कर्मचारी नेहमी एकाही वाहनांना विनाटोल सोडत नाही. मात्र, गजानन मारणे याच्या शेकडो गाड्या दोन्ही नाक्यांवर टोल न भरताच वेगाने पुढे रवाना झाल्या. उर्से टोलनाक्यापर्यंत ही मिरवणूक सुरू होती. त्यानंतर समर्थकांच्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाल्या. कोथरुडमधील पौड रोड येथील घरी रात्री दोन-तीन गाड्यांसह गजानन मारणे घरी पोहोचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here