जळगाव (प्रतिनिधी) – येथील स्टेट बँकेच्या शाखेत विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. शिव कॉलनी शाखेतील व्यवस्थापकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान कर्ज योजनेची माहिती घेण्यासाठी ३८ वर्षाची ही महिला मैत्रिणीसह शाखेत गेली होती. व्यवस्थापकाने महिलेला १५ दिवसानंतर सुट्टीच्या दिवशी शाखेत बोलवले आणि महिलेला शितपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून पिण्यास दिले. त्यानंतर व्यवस्थापकाने बँकेतच तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पिडीत महिलेने पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. गुंगीचे औषध दिल्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्यवस्थापकाने तयार केले आणि त्याच्याआधारे तो महिलेला ब्लॅकमेल करत होता.
या व्हिडीओच्या आधारे बँकेच्या व्यवस्थापकाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यासाठी त्या महिलेला पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. महिलेच्या या फिर्यादीनंतर पोलीसांनी मुंबईत राहणाऱ्या बँके व्यवस्थापक अशोक सिताराम शर्मा याला जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. एस.जी. ठुबे यांनी त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.






